Wednesday, December 10, 2014

विण -
एकेका गोष्टीशी आपले धागे कसे जुळलेले असतात. काल माझी पुतणी मला विचारत होती, "काकू, लग्न झाल्यावर तुला तुझ्या आई बाबांची नाही का आठवण आली? असं कसं आज लग्नं करायचं आणि आपलं घर सोडून नवऱ्याच्या घराला आपलं म्हणायचं?". चौदा वर्षांच्या त्या अड्गुल्या छकुलीला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर बालपणापासून विणायल्या घातलेल्या त्या विणकामात आहे. दोन टाके सरळ दोन टाके आडवे मधेच गाठीचा टाका कधी विण चूकली म्हणून थोडी उसवण पण परत बरोबर टाके. अश्या विणलेल्या चादरीत किती टाके आजीचे, किती टाके आईचे आणिक किती वडलांचे, भावंडांचे, नातेवाईकांचे, आसपासच्या मंडळींचे, कोकणातल्या घराचे, सुट्टीतल्या दिवसांचे, पुस्तकांच्या वासाचे, नवीन कपड्यांच्या अप्रुपाचे, कमी पडलेल्या मार्कांचे, अनपेक्षित मिळालेल्या बक्षिसाचे, न ठरवून केलेल्या गमतीचे, ठरवून केलेल्या उठाठवीचे, श्रावणात वाटलेल्या मेंदीचे, दिवाळीतल्या गेरूचे, दहावी नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचे, कॉलेजच्या पहिल्या दिवसाचे, अनोळखी ओळख घट्ट होण्याचे, चोरटी नजर झेलण्याचे, मान मोडून केलेल्या अभ्यासाचे, नोकरीच्या पहिल्या दिवसाचे, माहेरच्या पाठवणीचे, डोळ्यातल्या आठवणींचे, नवीन संसारातल्या ठेचा खाण्याचे, एकमेकांच्या चुका गोड मानण्याचे, मुलांच्या आगमनाचे, बाल संगोपानातल्या चुकांचे, लहान लहान आनंदाचे, दुख्खाचे, असीम सुखाचे, नवाच्या नवलाईचे; कितीतरी विणींची हि चादर अंगावर ओढली कि मग आयुष्य कसं उबदार आणि आश्वासक वाटायला लागतं. ही चादर विणून पूर्ण होत नाही, सोडलेले धागे नव्या टाक्यांची ओढ असते. हि "ओढ" आहे नं तीच त्या आठवणींना कुशीत घेते!
-रेवती ओक
" ज्ञानसागरातील  शिंपले"

"पुस्तक माणसाचा खरा मित्र असतो", हे सुभाषित मला नक्की पटलं आहे. सध्या माझे नुक व आय पॅड हे जवळचे मित्र आहेत. नुक जरा गप्प असतो कारण आय पॅड आल्यापासून माझं जरा दुर्लक्षच झालं त्याच्याकडे. आधी त्याला घेतल्याशिवाय माझं पानही हलत नव्हतं. आय पॅड काय आहे कि माझ्यासारखा आहे, एक काम करताना चार इतरही कामं हातावेगळी करतो. अर्थात कधी कधी पुस्तक वाचताना मधेच FB वर नेतो आणि मग काय मागच्या पानावरून गाडी पुढच्या पानावर यायला मध्ये FB चे बरेच STATUS UPDATE जातात. सध्या मी एकटी आहे अगदी कुणी म्हणजे कुणी नाही बोलायला म्हटलं काय हे आयुष्य आहे भर मैत्रीच्या घोळक्यातून एकदम असं एकाकी. आपण म्हणतो की तंत्रद्यानाच्या आहारी आता सगळे जात आहेत पण विचार करा अश्या एकट्या क्षणी मला जगभर फिरवून आणणारा माझ्या आप्तांशी संपर्कात ठेवणारा,माझी आवडती पुस्तकं जपणारा माझा आय पॅड माझा खरा मित्र नव्हे काय? पूर्वी होस्टेलवर असं एकाकी वाटलं की मी शांताबाईंनी अनुवादित केलेलं "चौघीजणी" वाचायचे आणि अगदी नेमकं म्हणजे त्यातल्या "ज्यो" ची व्यक्तिरेखा मला माझीच वाटायची त्यामुळे मीसुद्धा लिहिताना सफरचंद खायची सवय लावून घेतली होती, कधी खूप आनंद झाला की "मेग"ची व्यक्तिरेखा मला खूप आनंद देऊन जायची. तरी लहान असताना माझं आणि माझ्या ताईचं एक खायचं पुस्तक होतं ते म्हणजे,"मोठ्या रानातील छोटे घर", भा.रा.भागवतांनी "Little House on the Prairie" चं केलेलं भाषांतर होतं. त्यातला खाण्याच्या पदार्थांचं वर्णन वाचून आम्हाला इतकी भूक लागायची की मग आम्ही जेवतानाच ते पुस्तक वाचायचो. नंतर कधीतरी "ज्ञानसागरातील शिंपले" हे कुणी अज्ञात व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक माझं जीव की प्राण होतं कारण त्यात अद्भुत अश्या गोष्टी होत्या म्हणजे अक्रोडची कडक साल पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट तोंडाला लावली तर जबरदस्त गोरेपण येते किंवा पौर्णिमेला खीर खाल्ली ती बुद्धी तैल होते, स्वप्नात पाऊस दिसला तर सकाळी चमत्कार घडतो वगैरे अनेक. नंतरचा काळ होता तो फक्त व.पु.काळे आणि शन्नांचा! "पार्टनर" कादंबरी तर कित्येक वेळा वाचली असेल. शाळेतून घरी येताना वाटेतून आईला तिच्या शाळेत फोन करून नवीन पुस्तक आणायची आठवण केली की मग ती कोणतं पुस्तक आणेल ह्याचा विचार करीत घरी यायचं. आईने वाचनाची आवड निर्माण केली आणि बाबांनी इंग्लिश शब्दकोडी सोडवायची. ताईने मात्र जास्त पटकन शब्दकोड्यांची कला अवगत केली आणि मी वाचनात गुंगून राहिले. मग अनेक प्रकारची पुस्तकं वाचनात आली अगदी प्रतिभावान साहित्यिकांपासून ते तद्दन आणि टुकार साहित्यापर्यंत, अर्थात तद्दन आणि टुकार हे मत माझं नाही कारण कुठलीही गोष्ट लिहायला आणि नंतर ती छापून यायला किती कठीण असते ते मला पक्कं ठावूक आहे. तर पुस्तकांनी माझी कायमच साथ दिली अगदी २ दिवसांपूर्वीच आमच्या ह्या movingच्या गडबडीत देखील "No Easy Day" वाचलं. मला कधीही एकटेपण जाणवू नये ह्याची काळजी माझी लाडकी पुस्तकं नक्की घेतात आणि बदलत्या तंत्रद्यानामुळे माझे हे सगळे मित्र माझ्या आय पॅड च्या कट्ट्यावर खात्रीने भेटतात म्हणून "ई-रीडर" च्या ज्ञानसागरातील हे शिंपले वेचताना मला कधीच lonely वाटत नाही बरोबर नं?
गटारी-
"गटारी" या शब्दाशी माझं नातं जुनं आहे. दचकू नका पण, शाळेच्या कार्डावर पत्ता "वरळी गटाराजवळ" असा असल्यामुळे ते नातं अधिक घट्ट आहे! यंदा आषाढ सुरु झाला तो उन्हाच्या झळा सोसतच, आता कुठे आषाढ संपताना मेघ बरसू लागले आहेत. पाऊस उशिरा आला तरीही तारखे मागून तारीख येतेच आणी त्याबरोबर महिनेही. तसं प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणी अमावास्या ह्या यायच्याच हा सृष्टीचा नियमच आहे. माणसाने यात गम्मत आणण्याकरिता तर कधी काही बदल म्हणून तर कधी प्रकृतीमानासाठी सणवार आणी दिनमहात्म्य निर्माण केलं. एक काळ होता कि ह्या सगळ्या सणवारात एक अपूर्वाई होती, कांद्याची भजी कांदेनवमीला करायची, मोदक गणपतीतच व्हायचे, पाकातल्या पुऱ्या गौरीसाठी आणी चकल्या कडबोळी तर फक्त दिवाळीत किंवा लग्नघरी. प्रत्येक गोष्ट कशी सिझनल होती. त्यामुळे आपसूकच जीवनाला एक नियमितता होती. मला आठवत आहे तेव्हापासून श्रावण सोमवारी अर्धा दिवस शाळा आणी चार वाजता जेवण. मग रमत गमत शंकराला जायचं आणी मसाला दुध पिऊन घरी यायचं. आमच्याकडे काहीही चैनीच्या वस्तू नव्हत्या आणी त्याच्या बद्दल काहीही विशेष जाणीवही नव्हती तरीही आम्ही खूप समाधानी होतो. आज परिस्थिती काय आहे? सभोवताली हे सिझनल असणं विरून चाललं आहे, शिल्लक आहे ते फक्त सेलिब्रेशन पुरतं. उद्या गटारी, बाकी काही लक्षात नसेल पण उद्या खच्चून दारू प्यायची आणी नॉनव्हेज खायचं एव्हडच लक्षात आहे. बिर्याणीवाल्यांकडे महिना महिना आधी बुकींग करून झालं आहे, लिकर शॉप समोर मुंगीलाहि जागा मिळणार नाही अशी गर्दी आहे. हे सगळं कशासाठी? तर "गटारी गटारीचा" दिवस पाळण्यासाठी! गैरसमज करू नका, मला दारूचं वावडं नाही, एखादा ग्लास वाईन किंवा बिअर काहीच गैर नाही पण केवळ आपण त्या ग्रुपमध्ये सामावले जाऊ म्हणून न झेपण्य़ाएव्हढी दारू ढोसायची आणी हसं करून घायचं यात कसला आलाय मोठेपणा? मोठेपणा असेल तर तो यातच आहे कि समोरच्याच्या डोळ्यात भरण्यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत उतरत नाही नं याची खबरदारी घेणं आणी जे हि खबरदारी घेतात त्यांनी स्वतःच्या पाठीवर एक शाबासकी नक्की द्यावी! मध्यंतरी एका हॉटेलात आम्ही गेलो होतो, गप्पा चालू झाल्या, तेव्हड्यात दोन अगदी लहान म्हणजे जेमतेम अठरा एकोणीस वर्षांच्या मुली आणी त्यांचे आई वडील शेजारच्या टेबलावर बसले. मुली नको नको म्हणत असताना आईने त्यांच्यापुढे ग्लास ठेवले. खरी गम्मत पुढे आहे, आई इतकी तर्र झाली होती कि मुलीं शरमेने बेजार झाल्या होत्या. हे असं काही बघितलं कि मला एकदम गडबडून जायला होतं, कधी रामाकाळी घेतला जाणारा वाईनचा ग्लास डोळ्यासमोर खळ्कन फुटतो. काहीसं भानावर आल्यासारखं होतं. सध्या तर मला सगळीकडे घाईच घाई दिसते आहे, लहानांना मोठं करण्याची घाई, मोठ्यांना आणखीन मोठं होण्याची घाई. सगळ्यांचीच पुढे जाण्याची घाई आणी जीवघेणी स्पर्धा. स्वस्थपणे शांत श्वास दुर्मिळ झाला आहे. दोष मात्र आपण बदललेल्या हवामानाला आणी अवाजवी जाहिरातबाजीला देतो. वास्तविक दोन्हीला आपणच जबाबदार आहोत. माझ्या पुरतं मी पूर्वीसारखं सिझनल व्हायचं ठरवलं आहे, तुम्ही काय ठरवलं आहे? आता थोड्यावेळात "हैप्पी गटारी" चे मेसेज यायला सुरुवात होईल मग?……… उद्या वेळेवर उठलात तर सांगा मग काय केलंत ते !
"चाळीशी" -
आज टेकडीवर चालताना एका गृहस्थांनी हात केला आणि झपझप पुढे गेले. पुढची वीस एक मिनिटं मी मेमरी फाईल मधून त्यांना शोधत बसले. कोण होते? काय माहिती? म्हणजे मी त्यांना कधी भेटले आणि का? मग मेंदूला ताण देत ओळखीची सगळी प्रोफेशन्स आठवली. वकील नसावेत, म्हणजे माझी अजून वकिलांकडे जायची वेळ आली नाही कारण; चाळीशीने मला आणि मी कौस्तुभला चावूनही त्याचा संयम शाबूत आहे त्यामुळे त्याने वकिलाची पायरी चढली नाही आणि म्हणून ते हात केलेले गृहस्थ वकील नसावेत. मग कोण बरं, डॉक्टर? चाळीशीचा दंश झाल्यावर मी विषाचा उतारा शोधायला ज्या ज्या डॉक्टरांकडे गेले त्यापैकी तर एक नसावेत? पण शक्यताच नाही, कारण ती समस्त डॉक्टर मंडळी नुसतं मला बघूनच दवाखाना बंद करतात. आता मेंदूला ताण असह्य झाला , कोण होते ते? असं म्हणेपर्यंत परत तेच गृहस्थ समोर आता परतीच्या मार्गावर, मी त्यांनाच विचारणार तर तेच म्हणाले," काय म्हणता ओकबाई, काय हल्ली टेकडी काय?". आता मात्र माझा मेंदू दुखून अखेर बंद पडला, मी त्यांना तोंडावर म्हणाले,"नाही ओळखलं तुम्हाला". आता त्यांचा मेंदू गडाबडा हलायला लागला असावा असा त्यांचा चेहेरा झाला. "अहो मी वझे, माझी लायब्ररी आहे. तुम्ही येत होतात, पण हल्ली आला नाहीत मला वाटलं गेलात परत अमेरिकेत." साक्षात्कार झाल्यासारखी वझ्यांची लायब्ररी डोळ्यासमोर आली. त्यांची माफी मागून मी पुढे चालती झाले. "च्या …ला" त्या चाळीशीच्या माझ्या मनात भलताच "बग" घुसलाय कि काय, नि तो आता माझ्या मेंदूला सुद्धा कुर्तडतोय.
काय आहे हे चाळीशी प्रकरण? आपल्या आज्या नव्हत्या का झाल्या चाळीस, आई तर डोळ्यादेखत चाळीस झाली. पण त्याने आमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला असेल मला काही आठवत नाही. खरं सांगू का, हे "चाळीशी महात्म्य" वाचायला मला इतका वेळ लागेल असं मुळीच वाटलं नाही, पण प्रत्यक्षात मात्र ते भलतंच अवघड आणि वेळखाऊ निघालं.
चाळीशीचा "हेल्थ चेक-अप" झालाच पाहिजे, ह्या "स्वतंत्र महाराष्ट्र झालाच पाहिजे"च्या धर्तीवरील धोरणामुळे सगळ्याची सुरुवात झाली. चेक अप च्या लाईनीत सुद्धा "नियमित तपासणी", "सिनिअर सिटीझन तपासणी" आणि "चाळीशीचा प्रिव्हेनटिव्ह चेक अप" अशी वर्गवारी होती. आपण चाळीस वर्षांचे होतो म्हणजे अश्या एका उंबर्यावर येतो जिथे आतलं पाऊल सुखावलेलं असतं तर बाहेर टाकलेलं पाऊल नव्याच्या ओढीने आसुसलेलं असतं. ह्या आतल्या आणि बाहेरच्या पाउलांनी तो अवघड उंबरा ओलांडता आला कि तुम्ही जिंकलात. माझी मात्र त्या उंबर्याला चांगलीच ठेच बसली. मलम पट्टी करे पर्यंत आणखीन सहा महिने उलटून गेले तेव्हा कुठे आता मी भानावर आले. "ग्रेसफुल एजिंग" ग्रेसफुली स्वीकारणार्यांना माझा सलाम. चाळीशीचा उंबरठा डोळसपणे ओलांडता यावा म्हणूनच चष्म्याला "चाळीशी" म्हणत असावेत!
-रेवती ओक
चाळीस टक्के ऑफ %
रानडे रोड वरून चालताना आणि ते सुद्धा साड्यांच्या दुकानांवरून, पावलं आणि नजर थबकली नाहीत तरच नवल! मी सुद्धा काचेतून साड्या बघत होते आणि लक्षात आलं कि बहुतेक सगळ्या दुकानांच्यात चाळीस टक्के ऑफचा सेल लागला आहे. खरंच मी एका दुकानात गेले नी उत्सुकतेने विचारलं हे चाळीस टक्के काय आहे? माझ्या डोक्यात प्रत्येक आकड्याचं एक लॉजिक आहे, म्हणजे दिला न दिल्यासारखं म्हणजे पाच टक्के ऑफ; इकडे तर जास्त नको बेताचा बरा म्हणून दहा टक्के; सणासुदीला वीस किंवा पंचवीस; जुना माल संपवायचा पन्नास किंवा साठ टक्के ह्याच्या पुढचा डिस्काउंट माझ्या नजरे बाहेरचा आहे!
चाळीस टक्क्याची गम्मत वाटली, म्हणून विचारलं. दुकानातला माणूस म्हणाला चाळीस टक्के सिझनचा ऑफ असतो. आत्ता लग्नसराई म्हणून सगळ्या साड्या खपतात, महाग स्वस्त कशाही आणि चाळीस आकडा पण भारी असतो. मी माझ्या तोंडावर प्रश्नचिन्ह काढलेलं बघून तो म्हणाला, ताई अहो पन्नास टक्के ऑफ असला कि लोकांना वाटतं माल खपवतात आणि अगदी कमी ऑफ दिला तर सिझनला धंदा कसा होणार म्हणून हा चाळीस टक्के, बरोबर पटणारा आणि कुठलीही शंका न येणारा !
माझा मंद मेंदू काहीतरी खुणा करायला लागला, मी डोक्यात त्या कुरकुर करणाऱ्या खुणा घेत पुढे आले, आणि एकदम झटका बसावा तसा उलगडा झाला.
"मिड लाइफ क्राईसीस" ची लागण साड्यांच्या सेलला सुद्धा झाली! वरच्या आकड्यांचीच अनालोजी इथे पण…वयाच्या विशी पर्यंत कसं सगळं एक्सक्लूझीव असतं, पन्नाशीत अर्ध आयुष्य संपून नवीन उत्तरार्धात जाताना मागचं इमोशनल गाठोडं रितं करवसं वाटतं अगदी जुना माल खपवण्यासारखं!
पण चाळीस कसं आडनिड वय असतं धड तिशीची पायरी नाही आणि पन्नाशीची वेस नाही तरीही "अजूनही वेळ गेली नाही" असं. मला चाळीशी चांगलीच चावली, पण ह्या चाळीस टक्के ऑफ ने आशेचा नवीन किरण दाखवला, अजूनही पन्नाशी दहा वर्ष लांब आहे, ह्या पूर्वार्धात बरंच काही करता येण्यासारखं आहे, आणि मुख्यम्हणजे चाळीस हा आकडा आशावादी आहे. वा वा, ह्या नव्याने सापडलेल्या गमतीला अधिक लज्जतदार करण्यासाठी एक चाळीस टक्के ऑफची साडी घेऊनच टाकली!

-रेवती ओक