Wednesday, December 10, 2014

"चाळीशी" -
आज टेकडीवर चालताना एका गृहस्थांनी हात केला आणि झपझप पुढे गेले. पुढची वीस एक मिनिटं मी मेमरी फाईल मधून त्यांना शोधत बसले. कोण होते? काय माहिती? म्हणजे मी त्यांना कधी भेटले आणि का? मग मेंदूला ताण देत ओळखीची सगळी प्रोफेशन्स आठवली. वकील नसावेत, म्हणजे माझी अजून वकिलांकडे जायची वेळ आली नाही कारण; चाळीशीने मला आणि मी कौस्तुभला चावूनही त्याचा संयम शाबूत आहे त्यामुळे त्याने वकिलाची पायरी चढली नाही आणि म्हणून ते हात केलेले गृहस्थ वकील नसावेत. मग कोण बरं, डॉक्टर? चाळीशीचा दंश झाल्यावर मी विषाचा उतारा शोधायला ज्या ज्या डॉक्टरांकडे गेले त्यापैकी तर एक नसावेत? पण शक्यताच नाही, कारण ती समस्त डॉक्टर मंडळी नुसतं मला बघूनच दवाखाना बंद करतात. आता मेंदूला ताण असह्य झाला , कोण होते ते? असं म्हणेपर्यंत परत तेच गृहस्थ समोर आता परतीच्या मार्गावर, मी त्यांनाच विचारणार तर तेच म्हणाले," काय म्हणता ओकबाई, काय हल्ली टेकडी काय?". आता मात्र माझा मेंदू दुखून अखेर बंद पडला, मी त्यांना तोंडावर म्हणाले,"नाही ओळखलं तुम्हाला". आता त्यांचा मेंदू गडाबडा हलायला लागला असावा असा त्यांचा चेहेरा झाला. "अहो मी वझे, माझी लायब्ररी आहे. तुम्ही येत होतात, पण हल्ली आला नाहीत मला वाटलं गेलात परत अमेरिकेत." साक्षात्कार झाल्यासारखी वझ्यांची लायब्ररी डोळ्यासमोर आली. त्यांची माफी मागून मी पुढे चालती झाले. "च्या …ला" त्या चाळीशीच्या माझ्या मनात भलताच "बग" घुसलाय कि काय, नि तो आता माझ्या मेंदूला सुद्धा कुर्तडतोय.
काय आहे हे चाळीशी प्रकरण? आपल्या आज्या नव्हत्या का झाल्या चाळीस, आई तर डोळ्यादेखत चाळीस झाली. पण त्याने आमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाला असेल मला काही आठवत नाही. खरं सांगू का, हे "चाळीशी महात्म्य" वाचायला मला इतका वेळ लागेल असं मुळीच वाटलं नाही, पण प्रत्यक्षात मात्र ते भलतंच अवघड आणि वेळखाऊ निघालं.
चाळीशीचा "हेल्थ चेक-अप" झालाच पाहिजे, ह्या "स्वतंत्र महाराष्ट्र झालाच पाहिजे"च्या धर्तीवरील धोरणामुळे सगळ्याची सुरुवात झाली. चेक अप च्या लाईनीत सुद्धा "नियमित तपासणी", "सिनिअर सिटीझन तपासणी" आणि "चाळीशीचा प्रिव्हेनटिव्ह चेक अप" अशी वर्गवारी होती. आपण चाळीस वर्षांचे होतो म्हणजे अश्या एका उंबर्यावर येतो जिथे आतलं पाऊल सुखावलेलं असतं तर बाहेर टाकलेलं पाऊल नव्याच्या ओढीने आसुसलेलं असतं. ह्या आतल्या आणि बाहेरच्या पाउलांनी तो अवघड उंबरा ओलांडता आला कि तुम्ही जिंकलात. माझी मात्र त्या उंबर्याला चांगलीच ठेच बसली. मलम पट्टी करे पर्यंत आणखीन सहा महिने उलटून गेले तेव्हा कुठे आता मी भानावर आले. "ग्रेसफुल एजिंग" ग्रेसफुली स्वीकारणार्यांना माझा सलाम. चाळीशीचा उंबरठा डोळसपणे ओलांडता यावा म्हणूनच चष्म्याला "चाळीशी" म्हणत असावेत!
-रेवती ओक

No comments:

Post a Comment