Sunday, June 1, 2014

उत्तर-


प्रत्येकाला एवरेस्ट गाठणं शक्य नाही एवरेस्ट गाठलं म्हणून प्रत्येकजण काही हिलरी होत नाही,
जर मागचा हरला तरच पुढचा जिंकू शकतो म्हणून हरलेल्याची किंमत नक्कीच कमी होत नाही,
तुम्ही कशाला मानता एवरेस्ट त्यावर जिंकणं अवलंबून आहे समोरच्याची कीव करणं हे  त्याचं उत्तर नाही,
प्रत्येकाच्या मताला विशिष्ट गणित असतं त्या आकडेमोडीत पडण्याचं कोणालाच काही कारण नाही!


स्थिरावतोय म्हणताना अमेरिकेतून परतून वर्षं झालं. आयुष्य जिथे सात वर्षांपूर्वी सोडून गेलो होतो तिथेच परत आलो. भोवतीचा परिसर बदलला, शांत म्हणून निवडलेल्या आमच्या घरट्याच्या भोवती बजबजपुरी झालेली बघितली. ओळखीच्या चेहेर्यांशी पुनश्च ओळख केली. कितीही असह्य झालं तरीही आता हा आपला देश आहे असंच असायचं म्हणून कानाआड घातलं. पूर्वी कधीही न खटकलेल्या गोष्टी खटकल्या तरीही मनातच गिळून टाकल्या. आम्ही परत आलो, "का आलो? ग्रीन कार्ड झालं नाही कि काही जमलं नाही?का काही वेगळाच प्रॉब्लेम झाला? आता इतकी इतकी वर्षं राहिलात या आता परत, मग यायला नको परत?, काही नाही व्हिसा संपला असेल, दिला असेल कंपनीने डच्चू, न यायला काय झालं परत सगळं मांडलेलं आहे, डॉलर आणलेत नं मग इथे काय आणि तिथे काय, मग तीच कंपनी कि दुसरी बघितली, मग परत कधी जाणार?, ग्रीनकार्ड ठेवून आलात कि घेवून?". ह्या जीवघेण्या प्रश्नांना तोंड देत आम्ही वर्षभर ताठ उभे आहोत. हे प्रश्न आणि ते विचारण्याची मानसिकता, तीव्रता प्रत्येक माणसागणिक वेगळी असते. ते एव्हढले खोके मी एकटी उचलून वजन काट्यावर ठेवत असताना जो छद्मीपणा मला तिथल्या ऑफिसरच्या डोळ्यात दिसला तोच "आता आलात कि नाही परत" ह्या थाटाचा भाव गेली वर्षभर मला जाणवतो आहे. पण तरीही हे सगळं बोलायची हिम्मत झाली नाही कारण आम्ही गुन्हा केला होता, वर्षभरासाठी जातो म्हणून सांगून तब्बल सात वर्षांनी परत आलो होतो. मी खरंच सांगते मला अजिबात परत यायचं नव्हतं म्हणजे माझ्या मनाने मी अजूनही माझ्या आवडत्या अमेरिकेतच आहे. काय हरकत आहे मी माझ्या मतावर ठाम राहायला? पण आपल्या कुटुंबाला हे मान्यच नाही. परत आलेले अनेक जण आनंदाने राहताहेत, पण एकत्र भेटले कि अजूनही अमेरिकेतच अथवा अन्य देशात अडकले आहेत ह्याचीच जाणीव होते. प्रत्येकाचं घर त्याच्या परदेशातल्या वास्तव्याच्या खूणा अंगावर झेलत आहे त्याला मी तरी कशी अपवाद? 
थोडं स्वातंत्र्य, नवीन मिळालेली संधी, भवतालच्या मोकळ्या वातावरणाची ओळख, नवरा बायको मधलं सैलावलेलं नातं , स्वच्छ सुंदर हवा, मुलांची अप्रतिम शाळा, हाताशी असलेली साधनं आणि मुख्य म्हणजे कोणालाही दबून न राहता घेतलेला मोकळा श्वास ह्यांनी मला अमेरिकेशी बांधून ठेवलं आहे. माझ्यात असलेल्या लेखनाच्या आवडीची झालेली जाणीव असो वा भेटलेले अनेक सुह्रुद असोत हि माझी कायमस्वरूपी पुंजी आहे. ती पुंजी अशी कशी विखरून देऊ? इकडे आणि तिकडेच्या तिढ्यातून वाट काढायचा प्रयत्न केला आणि गुरफटत गेले. अमेरिकेतून येताना माझ्या सगळ्या आठवणी मनात न ठेवता मी क्रेगलिस्ट वर लावायला हव्या होत्या. ओल-फ़ाक्टरीत इतके गंध दाटले आहेत कि ते; वासागणिक श्वासागणिक मला शिकागोची, शार्लटची , लॊङ्ग आयलंड वरच्या अप्रतिम दिवसांची याद वारंवार करून देतात. मी इथे रमायचा प्रयत्न करतेच आहे पण म्हणून माझी अमेरिकेची असलेली ओढ संपणार नाही. परत यायला लागलं म्हणून कीवही करू नका अथवा आता आलात नं मग जमवून घ्या असंही सांगू नका कारण मी खूप हळवी आहे. माझ्या आठवणी माझ्या आहेत माझ्या मालकीच्या आहेत तुम्ही सांगाल आणि मी विसरेन असं शक्य नाही!

-रेवती ओक