Saturday, November 10, 2012

दोन पावलं अंतर-

तळ्याकाठचा वारा हसतो दूर असूनही खुणावतो, 
श्वासा श्वासा मध्ये माझ्या त्याचा पिंगा रुणझुणतो;
त्या वाऱ्याचा ध्यास वेगळा खिन्न मनाला जागवतो, 

स्पर्शानेही नुसत्या त्याच्या अंतर्नादही गुणगुणतो;
मैत्रीचा आश्वासक गंध जवळ असूनही दुरावतो, 

माझ्या हातामधून नुसता काळ वाळूचा पुढे सरतो;
तुमचा आठव तुमचा वावर एकसारखा
जाणवतो , 
मैतर माझे पैल किनारी  ऐल किनारा मुसमुसतो!

योग्य वेळेला योग्य ठिकाणी असलेल्यांचा मला खरंच  हेवा वाटतो! नाहीतर मी, चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी असते. गेल्या १४ वर्षात जरा कुठे बस्तान बसतं आहे आणि आता काहीतरी मनाजोगतं करता येईल असं वाटतं  आहे  तोच दिशा बदलते आणि प्रवास नव्याने सुरु होतो. त्या पालीच्या गणितासारखं आहे, चार पावलं पुढे आणि दोन पावलं मागे. ह्या हिशोबाने जेमतेमच पावलं  पुढे टाकली म्हणायची मी. आज हे लिहिताना मी अगदी एकटी आहे, चार आठवड्यापूर्वी चहुबाजूला असलेल्या माणसांतून आज अचानक आजूबाजूला कोणीच नाही. नवीन ओळखी करणं काही कठीण नाही पण हल्ली जरा अवघड जातं. समोरचा आणि आपण ह्यातला समान दुवा शोधून ती मैत्री वाढवणं कि कला आहे आणि मला इतके दिवस वाटत होतं कि आपल्याला हे अगदी लीलया जमतं पण बदलत्या काळात हे समान दुवे सापडतच नाहीत. ६वर्षांपूर्वी शिकागोला मला भेटलेले सगळे त्यानंतर शार्लटचे माझे मैत्र मला इकडे सापडणार नाहीत हे नक्की तरीही मला परत एकदा जोमाने प्रयत्न करून नवीन ओळखी वाढवायला हव्यात कारण गरज त्यांना नाही मला आहे. एक जाणवलेली गोष्ट म्हणजे वास्तव आणि मी ह्यात नेहेमीच दोन पावलं अंतर राहिलं आहे. आजूबाजूच्यांना समजून घेताना ते टेकडी चढूनही जातात आणि मी मात्र पायथ्याशी स्वतःच्या कमकुवत पावलांकडे बघत असते. कदाचित विधात्याला आता हे मान्य नसावं म्हणून मला अशा एकांतात आणलं आहे कि माझ्या कमकुवत पावलांना ते दोन पावलं अंतर भरून काढायला शिकवायचं आहे!