Tuesday, October 16, 2012

गप्पा

कशी कुठे जुळली असते प्रत्येकाची नाळ, जसे असते नावापुढे ओळखीचे गाव;
विसरून जाते अस्तित्वाची खरीखुरी गोष्ट, पावलांनाही होते अनोळखी वाट;
हातावरच्या रेषा सुद्धा पुसट होत जातात, नवीन नाती शोधत नवी वळणे घेतात;
कधीतरी मग एक असे वळण येते, मन एक सांगत असते तरी पा‌ऊल तिथेच थांबते;
काय आहे तिथे असं थबकण्याजोगं, धूसर दिसून सुद्धा वाटतं काहीतरी नवं!

      मला गप्पा मारायला खूप आवडतं आणि माझी खात्री आहे तुम्हाला सुद्धा माझ्याशी गप्पा मारायला आवडेल. ह्या शिळोप्याच्या गप्पांमधून जसं मला स्वतःला शोधता आलं तसंच बघा तुम्हाला सुद्धा शोधता येतं का ते! काय आहे की इतक्या वर्षांत जे मनात होतं ते कागदावर उतरवता आलं, म्हणजे जे वाटलं ते बोलले, मनापासून गोष्टी शे‌अर केल्या, अगदी जे आठवलं ते सांगितलं. वर म्हटल्याप्रमाणे आपण आयुष्यात पुढे जाताना मागचं सगळं सपाट करत जातो पण तरीही अशा गप्पांमधून, शे‌अरिंग मधून परत एकदा पुसून गेलेलं मनात उमटतं, आणि मनावरची धूळ पुसून काढावीशी वाटते. आपण सगळेच आपला देश सोडून स्वेच्छेने सातासमुद्रापार आलो, इथली जीवनशैली स्वीकारली, भाषा जवळची केली तरीही आत खोलवर जी मुळं आहेत ती परत परत रुजतात आणि अशा गप्पांमधून वाढीला लागतात. मला आठवतं माझे एक आजोबा त्यांच्या आयुष्याच्या चाळिशीत ठाण्यात स्थायिक झाले, ते अगदी ९० वर्षांचे हो‌ईपर्यंत, पण ओळख सांगताना ते "हल्ली ठाण्यात असतो पण मूळचे आम्ही कर्ल्याचे, रत्नागिरीचे", अशी ओळख सांगायचे. आपण सुद्धा नाही का, आडनावाबरोबर त्याला एक मूळगाव चिकटवतो? वास्तविक निम्मी माणसं त्या गावाच्या वाटेला गेलेली देखील नसतात, परंतु न बघता सुद्धा त्यांना अप्रत्यक्षरीत्या ह्या अशा शिळोप्याच्या गोष्टी त्या वाटेवर ने‌ऊन आणतात. काय झालंय, ह्या नव्या जमान्यात तांत्रिक दृष्ट्या आपण इतके जवळ आलोत की प्रत्यक्ष बोलण्यातील मज्जाच हरवून बसलो आहोत. माझे आजोबा, अण्णा रोज आम्हाला त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगायचे आणि इतक्या रंगवून सांगायचे की ज्याचं नाव ते! अशाच गोष्टींत एक गोष्ट असायची ती वेगवेगळ्या पदार्थांची. केळीच्या पानात भाजलेले कंद, पाणचुलीत भाजल्या जाणाऱ्या आंब्याच्या को‌ई, मोहरीचा सणसणीत खार असणारे उकड‌आंबे आणि अशाच कितीतरी. हे सगळं आठवताना वाटतं, की आपल्या पिढीपर्यंत ह्या गप्पा, आठवणी समजण्यासारख्या असतील पण पुढे काय? आपण जेव्हा अशा वयात ये‌ऊ तेव्हा हे संदर्भ आपल्या पुढच्या पिढीला किती असंबद्ध वाटतील नाही का? अहो पण हे चुकीचं आहे, फक्त हजारो मैल दूर आलो म्हणून काय झालं, शेवटी जिथे आपल्या पिढ्यान पिढ्या वाढल्या, घडल्या त्या जगाची ओळख नवीन रक्ताला नको का? कितीही पाठ फिरवली तरी सत्य काही बदलता येत नाही, अगदी कायद्यानुसार बाहेरचे नागरिक झालेले तुम्ही जिथून आलात त्याची बांधिलकी सोडू म्हटली तरी सोडत नाही. नाटक, सिनेमे, गाणी, अगदी स्वतःला अद्ययावत ठेवता पण मुलांना किती पोचवता? नाही नाही माझं असं अजिबात म्हणणं नाही की मराठीत Ph.D. करा पण निदान पाठ तरी फिरवू नका. त्यांना तुमच्या साठी तरी आपली भाषा शिकवा. तुम्ही आम्ही जी गम्मत आपल्या आजोळी, गावी, शहरात केली त्याचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवा. बरेच वेळा पाहण्यात आलं आहे, की १२-१३ वर्षांची हो‌ईपर्यंत बरं मराठी बोलतात पण नंतर मात्र खडखडाट! मग उगीच आपण म्हणणार त्याला कळतं सगळं पण नीट बोलता येत नाही, म्हटलं ही मुलांच्या विरुद्ध तक्रार नाही तुमच्या बद्दल आहे. सवय लावलीत तर गोडी निर्माण हो‌ईल, समभाषिक वातावरणात त्यांना सहज व्यक्त होता ये‌ईल, नाहीतर आहेच मग ना इकडचे ना तिकडचे! माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा मुलगा भारतात आज्जीला भेटायला गेला, आजीला वाटलं नातू येतोय इतक्या वर्षांनी तर कुठे ठेवू नि कुठे नको, पण ह्याला हो-नाही शिवाय मराठी बोलायची सवय नाही, कळत होतं सगळं पण बिचारी आजी त्याच्या हो नाही वरच समाधान मानती झाली. आणखी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांना आपल्या संस्कृती बद्दल कुतूहल आहे, आज जगभर भारतीय बुद्धिवंतांचा गवगवा आहे, योगाच्या माध्यमातून, पर्यटनातून भारत अधिकाधिक मुलांच्या मनात प्रगल्भ होतो आहे, तर त्यांची ही जिज्ञासा थोपवू नका, त्यांना आपल्या देशाची ओळख नव्याने करून द्या. पुढल्या भारताच्या दौऱ्यात जरा कोकणात जा, लाल मातीत पाय रंगवा, तिकडे विदर्भ मराठवाड्यात sunscreen शिवाय जा, बघा तुमच्या आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी ये‌ईल. अरे आपण तर गप्पात हरवूनच गेलो! बघा अश्या गप्पा रंगायला काही ओळखच हवी असं नाही आणि बोलता बोलता हळू हळू होईलच कि परिचय. बरं आत्ता येते पण परत माझ्या कट्ट्यावर यायला विसरू नका अजून बरंच काही बोलायचं आहे!

3 comments:

  1. गप्पा मारायला मलाही प्रचंड आवडतं ..त्या मुळे कट्ट्यावर येणारच..
    शुभेच्छा..!

    ReplyDelete
  2. तूझं लिहिणं डोळ्यासमोर चित्र उभं करतं....मस्त !!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Kedar, sorry for the delayed reply!!!

      Delete