Thursday, April 11, 2013

"गरजे पुरती"

 
आम्हाला Charlotte च्या घरात येउन आता २ महिने होत आले होते. घर लाउन झालं अगदी बाहेर चार झाडं सुद्धा लाउन झाली पण माझा वेळ काही जाईना. अजून शेजारी कोण आहेत ह्याचा काही पत्ता लगेना. अगदी शेजारच्या घरात कुत्रे असावेत असा अंदाज केला कारण अधूनमधून कधीतरी भुंकण्याचा आवाज येई पण तरी अंदाजच कारण मागे एकदा शिकागोला असताना माझ्या शेजारणीच्या क्रिस्टीनच्या घरातून लहान मुलाचा आवाज येई. ती मला laundry रूम मध्ये भेटे तेव्हा तिला "जिना" ने किती जागवलं हे ती आवर्जून सांगत असे आणि मला नचिकेत बद्दल तो काय करतो ह्याच्या बद्दल आपुलकीने विचारे. थोडी ओळख झाल्यावर मी तिला म्हटलं कि ये एकदा जीनाला घेऊन माझ्याकडे, तशी तिने हो हो म्हटलं. दोन तीन दिवसांनी दारावर बेल वाजली म्हणून बघायला गेले तर क्रिस्टीन आणि कडेवर जिना. घरात आल्यावर तिने जिनाला माझ्याकडे वळवून बोलायला लागली पण मला भोवळ यायची वेळ आली, तिच्या हातात एक अप्रतिम अगदी खऱ्या बाळासारखी दिसणारी बाहुली होती. क्रिस्टीन एकटीच होती, ती अगदी व्यवस्थित नोकरी करत होती पण मुलाची आवड अशी भागवत होती. ह्या अनुभवाने Charlotte ला शेजारी कुत्र्यांचा जरी आवाज आला तरी नक्की कोण आहे ते दिसेपर्यंत अंदाज बांधायचा नाही असं ठरवलं. तर अजून कोणी बोलायला नाही म्हणून मी चिंतेत असताना एक दिवस समोरच्या घरात U-Haul चा ट्रक दिसला आणि मी आशेवर आले. बराच वेळ झाला तरी कोणी उतरेना म्हणून मी हातात पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन गेले. गाडीत एक मध्यम वयीन स्त्री आणि शेजारी ९-१० वर्षांचा एक मुलगा असे बसले होते. मी माझी ओळख करून दिली आणि पाणी ऑफर केलं. ती पट्कन गाडीतून उतरली आणि तिची ओळख निकोल म्हणून करून दिली. तिच्याबरोबर तिचा मुलगा Mavrick होता. तिथून पुढे आमची मैत्री जमून गेली. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी नवऱ्याने दगा दिला म्हणून तडकाफडकी बाहेर पडलेली निकोल एक तज्ञ Nurse होती. सगळी सुखदुखः रोज २-३ सिगरेटच्या पाकिटात झुर्कावून स्वतःला आनंदात ठेवत होती.
एक दिवस घरी आली ती अत्यानंदात कि तिला तिच्या बरोबरच्या एका डॉक्टरने डेट वर बोलावलं होतं. शुक्रवारी Mavrick ला आमच्याकडे सोडून निकोल डेट वर गेली आणि साधारण दोन तासातच तिरमिरलेल्या अवस्थेत घरी आली ती सरळ Mavrick ला घेऊन गाडीतून निघून गेली. पुढचे दोन दिवस तिचा पत्ताच नाही. ह्या देशात समोरच्याच्या भानगडीत आपण पडू नये असं अनेकांनी सांगून सुद्धा शेवटी मी तिच्या आईला फोन केला. निकोल मुलाला घेऊन कॅनडाला तिच्या नवऱ्याकडे गेली होती. त्या डॉक्टरने तिला डेटच्या पहिल्या तासातच मुलाच्या custodyबद्दल विचारून तिचा मूड घालवला आणि त्याच रागाच्या भरात ती Mavrick ला त्याच्या वडिलांकडे सोडायला गेली. निकोल परत आली तीच मुळी पुरती उद्वस्त होऊन, Mavrick तर आधीच हरवलेला होता आता तर तो घुमा आणि सदैव घरात असायचा. मध्ये बरेच आठवडे गेले मी निकोलशी बोलून आणि एक दिवस भल्या पहाटे ह्या बाई लेकासकट दारात. मी काही विचारायच्या आत मला मिठी मारून म्हणाली,"मेगन, मला नवीन जॉब मिळाला, फक्त E.R. मध्ये असल्यामुळे वेळा बदलत्या आहेत. तू Mavrick ला सकाळी शाळेत सोडशील का?". मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता आणि मग रोज माझी कसरत सुरु झाली. कधी कधी सकाळी सहा वाजताच बेल वाजे तर कधी रात्री. नंतर नंतर मला अगदी असह्य झालं पण शब्दात अडकले होते नाही कसं म्हणणार! आणि त्याच दरम्यान दर शुक्रवारी निकोल बरोबर एक रॉड नावाचा एक इसम तिच्या बरोबर यायला लागला. अजून तिने माझ्याशी ओळख करून दिली नव्हती पण अंदाजाने कळलं कि हा नवीन मित्र असावा. त्यानंतर Mavrick चं आमच्या कडे येणं एकदम कमी झालं. बऱ्याच वेळा तो रॉड बरोबर जाई किंवा घराचं दार उघडून एकटाच घरात थांबे. निकोल आता स्थिर होते आहे असं वाटेपर्यंत रॉड एका मोटर सायकल अपघातात दगावला. आता मात्र निकोल आणि Mavrickची मानसिक अवस्था इतकी दोलायमान झाली होती कि तिची आई आणि बहिण येउन जाऊन राहू लागल्या. त्यात भरीस भर म्हणून तिचा नवीन जॉब गेला. स्वाभिमानी माणसाला सहानुभूतीची भिक नको असते आणि नेमकं तेच निकोललाही नको होतं. मी मधेच खबरबात घेत होते पण काहीच अंदाज येत नव्हत. अशातच निकोल एक दिवस संध्याकळी पांढराशुभ्र ड्रेस घालून बोलायला आली. ती चर्चच्या Sympathy ग्रुपमध्ये जाऊ लागली होती. मला काहीच समजेना तेव्हा तिने सांगितलं कि जगात अशी अनेक माणसं आहेत कि ज्यांना लोकांची सहानुभूती नको असते पण कुठेतरी मनमोकळे पणाने अश्रू ढाळायचे असतात ती मंडळी एकत्र येउन आपापली दुखः व्यक्त करून अश्रूंना वाट करून देतात." ह्या दोन आठवड्यांच्या कोर्स मध्ये निकोलचं दुखः किती कमी झालं त्यापेक्षा ती कुठे तरी गुंतली गेली. ह्या गुंत्यात नवीन नवीन मित्र मंडळी तिच्याकडे येत होती जात होती.
मी तिच्यातलं माझं लक्ष केव्हाच काढून घेतलं होतं पण मन मात्र कधी कधी तिचा विचार करायचं आणि एक दिवस ज्याची भीती आधी होती ते झालं, निकोलकडे पैसे आणि नाती ह्याचं अकाउंट रिकामं झालं होतं. तिच्या घरासमोर परत एकदा "भाड्याने देणे आहे"अशी पाटी लागली, निकोल त्या घरून बाहेर पडली.मला न सांगता ती निघून गेली, पुढचे बरेच दिवस मला तिचा इतका राग येत होता कि मी तिच्या मुलाला सांभाळत होते, दारं उघडी टाकून घर सोडून गेली होती तेव्हा मीच तिच्या आईला कळवलं होतं. तिच्या sympathy ग्रुप ला तिला अनेकदा सोडलं होतं, तिचं दुखः हलकं व्हावं म्हणून माझं मात्र मी "emotional dumpster" करून घेतलं आणि हिला जराही ह्याची पर्वा नाही! काही दिवसांनी मी ते विसरले खरी पण मग लक्षात आलं कि कोणाकडून मैत्रीची अपेक्षा केली? जिला तिचं एकही नातं टिकवता आली नाही तिच्याकडून? कशावरून तो नवरा हिला कंटाळला नसेल? का हिची बहिण हिच्याकडे यायची थांबली?आई सुद्धा गरजेपुरती असायची आणि नोकरीचं मला काहीच माहिती नाही. त्यापुढे स्वतःला सावरायचं ठरवलं कोणालाही लगेच हो म्हणायचं नाही अर्थात माझा हा निर्धार त्या घरात "किम" आणि कुटुंब येई पर्यंतच टिकला!

Friday, March 15, 2013

"कुतूहल"
       परवा "बालक-पालक" हा बहुचर्चित मराठी चित्रपट पहिला आणि "बी-पी" ह्या तथाकथित झाकल्या मुठीची नवीन उकल करणारा एक चित्रपट बघितला असं वाटे पर्यंत एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने लक्षात आली की जगात फक्त दोनच जाती आहेत एक "नर" आणि दुसरी "मादी"! जे काही कुतूहल आहे ते ह्याच दोन घटकांभोवती फिरतं आहे. ह्या कुतूहलातून जर मोठी माणसं सुटली नाहीत तर ही अर्धवट वयातली कच्चं ज्ञान असलेली मुलं तरी कशी सुटतील? मला आत्ता वयाची चाळीशी आली तरी ह्या विषयावर लिहिताना पन्नास वेळा विचार करावा लागला कारण उभ्या आयुष्यात ह्या विषयावर बोलण्याची हिम्मत झाली नाही. ते कशाला? रेल्वे स्टेशन वर ती टांगलेली पुस्तकं असतात नं त्यांच्याकडे तर एका डोळ्याने बघायची सुद्धा लाज वाटायची. मी एक वाचनालय लावलं होतं तिथे उंचावर काही मासिकं असत. मला भयंकर कुतूहल होतं कि काय असेल त्यात? आणि एक दिवस दुसरं पुस्तक शोधताना वरून एक मासिक अचानक खाली पडलं. आता पडलंच आहे तर बघू म्हणून मी उघडणार इतक्यात तिथल्या क्लार्क बाईंनी ते मासिक हिसकावून घेतलं आणि माझं कुतूहल तसंच राहिलं. माझी नक्की खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला त्याच्या आड वयात अशी एकदा तरी संधी येते हे कुतूहल जाणण्याची पण अशी संधी बहुतांशी हुकतेच. ज्यांना समंजस पालक असतात त्या सगळ्यांचं वयात येणं सुसह्य होतं पण ज्यांची भावनिक घुसमट होते त्यांचं कुतूहल काहीवेळेला वेड्या वळणावर सुद्धा जातं.
       माझ्या मुलाच्या शाळेत गेल्यावर्षी "Health Education" च्या खाली ह्या "कुतूहलाशी" त्यांची पहिली ओळख करून देण्यात आली पण त्या आधी घरी एक पत्रक आलं ज्यात मुलांना नक्की काय सांगणार आहेत ह्याची माहिती होती आणि पालकांची त्यासाठी संमती हवी होती. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा घरी आला आणि त्याने सांगितलं की त्याला "Health Education" मध्ये जायचं नाहीये कारण त्याचे दोन मित्र जाणार नहियेत. मला जरा नवल वाटलं म्हणून मी एका मुलाच्या आईला ह्याबद्दल बोलायला फोन केला तर तिने मला सांगितलं की; "हे जरा लवकरच होतंय सगळं, मुलं किती लहान आहेत अजून आणि हे असलं घाणेरडं ऐकून त्यांच्या मनावर किती परिणाम होईल?". मी स्तब्ध झाले कारण काळ बदलला आहे ह्याकडे पालक किती दुर्लक्ष करताहेत ह्याची परत एकदा जाणीव झाली. म्हणजे आजूबाजूला जे चाललं आहे ते मुलं वजा करून जाताहेत का? त्यांना नसतील प्रश्न पडत? की उठसूट हे बाया बुवे टीव्हीवर,जाहिरातीत,मासिकांच्यात पापे घेतात, मिठया मारतात, बिचवर लोळतात म्हणजे नक्की "हे" आहे काय? आपल्यापैकी प्रत्येकाच्या मुलांनी एकदा तरी "बाळ कसं होतं?" हा प्रश्न विचरून आपल्याला कोड्यात टाकलेलं असतं. मी माझ्या मुलाला सांगितलं होतं कि मी त्याला "दवाखान्यात" बुक केलं होतं (माझं नशीब कि त्याने रिसीट मागितली नाही). हे तेवढ्यापुरतं ठीक आहे पण मुलांच्या आणि मुलींच्या आयुष्यात पहिले स्त्री पुरुष त्यांचे आई-वडील असतात आणि अशी वेडी वाकडी माहिती मिळून काहीवेळेला मुलांच्या मनात आई वडिलांच्या बदल दुराग्रह/राग निर्माण होऊ शकतो.
          बरं हे जे "कुतूहल" आहे नं हे फक्त "मिलनाची माहिती" ह्यापेक्षा खूप जास्त आहे. ह्यात जबाबदारीची जाणीव आहे, स्त्री बद्दलचा आदर आहे आहे त्यावेळेलाच प्रेमाचाही जबाबदार स्वीकार आहे. ज्याचं "कुतूहल" ह्या मार्गांनी शमतं तोच भावी आयुष्यात एक चांगला नागरिक बनू शकतो. माझ्या आठवणीत लहानपणी "केअर-फ्री" ची जाहिरात आली की "हे धरणी मला पोटात घे" असं व्हायचं कारण "महिन्याचं ते गुपित" फक्त बायकांपुरतंच असावं असा दंडकच होता जणू. काही नियम आणि चौकटी अबोल असतात पण त्या जर वेळीच बोलक्या झाल्या तर समाजालाच त्याचा फायदा आहे हे कळायची वेळ खरं तर उलटून गेली आहे. हल्ली बहुतेक शाळांमध्ये " "Health Education" आहे, पण तुम्ही जर ह्याच कुतूहलातून तुमच्या तरुणपणी गेला असाल तर तुमच्या बालकाचे पालक तुम्ही व्हा आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणा,"बोल मित्रा"!

Tuesday, March 12, 2013

केसांचे काय करायचे?


केसांचे काय करायचे?

छे बुवा हे लफडंच आहे केसांचं! मला माझे केस सोडून (आणि बांधून सुद्धा...हा हा हा) सर्वांचे केस सुंदर दिसतात. सरळ केस, कुरळे केस, लाटा लाटांसारखे झुलणारे केस, बेधुंद मुक्त केस, कपाळावर रुळणारे केस,लांबसडक केस,काळेभोर मऊसुत केस,किंचित कुरळे पण किंचित सरळ केस,कानाबरोबर कापलेले छोटे केस,मानेवर रुळणारे आत्मविश्वासी केस,कसेही वळवले तरी सुंदर वळणारे केस, मधोमध भंग पाडलेले केस,चपचपून तेल लावलेले केस,तुर्रेबाज केस,मेंदीने रंगवलेले केस,रंग उडालेले केस,पांढरे केस,खरबरीत केस,विस्कटलेले केस,छान कापलेले केस!!! बापरे किती प्रकार ह्या केसांचे पण एकही प्रकार माझा असा नाही म्हणजे बघा जर कुठे केस वाळवावेत तर नेमका पाण्याचा हात लागतो, ब्लो ड्राय करून बाहेर पडणार इतक्यात पावसाची सर यावी आणि केस चपटे, मस्त पिना बिना लाऊन तयार व्हावं आणि स्वेटर चढवताना नेमकी पिन अडकावी. केस सरळ करावेत तर ट्रेंड कुरळ्या केसांचा येतो, मग परत कुरळे करायचे तर सरळ केस झटक्यात ट्रेंडमध्ये परत हजर! आहे कि नाही पंचाईत? बरं काही नको तो झमेला आपले आहेत ते बरे म्हणून कुठे जावं तर तिथे सगळ्याजणी अश्या काही सूड घेतल्या सारख्या केसांचे प्रकार करून आलेल्या असतात कि आयत्यावेळी आता काय करायचं म्हणून डोकं दुखायचं नाटक करत एकसारखं केसात हात फिरवत बसायला लागतं. कठीण आहे, केसाचं नक्की काय करायचं हे केसांच्या गुंत्यापेक्षा महाकिचकट आहे.

Saturday, March 9, 2013

दोन कविता-


तुझ्यासाठी-
 

अश्या धुंद वेळी तुझी जाग येते कितीदा तरी मी शहारून जाते,

मोहरून गात्रे सैलावाताना मिठीची तुझ्या याद परतून येते!

कुशीच्या उबेची दिशा शोधताना अत्तराची तुझ्या पुन्हा झिंग येते,

मिटूनीच डोळे ओलावताना स्पंदनांची तुझ्या राजसी भूल पडते!

तरंगुनी डोहात सुखावताना मी तुझ्या नेत्री रात्रीस बोलावते,

असे काय होते कळेना मला म्हणुनी तुझा हात हातात घेते!

 

प्रेमात-

एक क्षण असा येतो काळजाचा ठोका चुकतो, परत येता भानावर तुझा हात हातात असतो;
दिवसाच्या एका वेळी असा काही भास होतो, अवती भवती सगळीकडे मला फक्त तूच दिसतोस;
एकंच एक विचार माझ्या मनात रुंजी घालत असतो,परत परत कसे आपण एकमेकांच्या प्रेमात पडतो;
मी काही न बोलता तुला हे कसं कळतं आणि प्रेमात पडल्यावर जग किती सुंदर दिसतं!
 

Friday, March 8, 2013

भूमिका-


नचिकेत ने 'आई' म्हणून सकाळी उठवलं आणि मला 'Happy Hug" दिला.दिवसाची सुरुवात जरी आई म्हणून होत असली तरी आईच्या फ्रेममधून बाहेर येउन वेळ काढून नवऱ्याला काय हवं ते एक 'बायको' म्हणून बघतेच. आई बाबांचा फोन आला की त्यांच्यासाठी मी त्यांची लहान "मेघू" असते.माझ्या शालिनी काकूची मी "शरी" आहे. माझे सासरे मला माझ्या बोलण्याच्या सवयीमुळे " कीर्तनकार" म्हणतात तर माझा लाडका केतन मला "वेवती मावशी" म्हणतो! माझ्या वर्षाताईचा मुलगा मल्हार त्याच्या लहानपणी मला "झेगुना मावशी" म्हणायचा आणि माझा नचिकेत "लिली" म्हणून हाक मारायचा. केतकी अजूनही "मेघूताई"च म्हणते पण केतकीची आजी मला "मेधना" म्हणायची. माझ्या प्रिय अण्णांची मी "बावा" आहे पण आजी मात्र "मेघूडिच"म्हणायची. शाळेत शिक्षकांच्यात मी "वर्षाची बहिण" होते पण देवरुखला माझा रामूमामा मला "मेघू कनकडी" चिडवे. आमची काम करणारी बाया आणि जनी मला "मेंगु" म्हणत. ह्या इतक्या सगळ्या नावांच्यात हरवून जाताना कौस्तुभ मात्र मला मेघनाच हाक मारतो.प्रत्येक नावाबरोबर माझी भूमिका वेगळी आहे आणि तरीही हि सगळी नावं परस्परांना अनभिज्ञ आहेत. शाळेत कागदावर चिकटलेलं "रेवती" हे नाव माझी ओळख आहे की माझी ओळख प्रत्येक नावागणीक वेगळी आहे हे बरोबर आहे? खरं सांगू पूर्वी मला ह्यातल्या काही नावांचा राग यायचा पण आयुष्याच्या ह्या वळणावर आता असं वाटतंय की किती बहुरंगी नाती मी स्वतःसाठी निर्माण केली आहेत. ह्यातली प्रत्येक भूमिका मला मान्य आहे आणि तेच माझं आत्तापर्यंतचं संचित आहे!

Saturday, March 2, 2013

"निर्भया"

नवीन अर्थ-धोरणात "निर्भया निधी" चा उल्लेख वाचून मन विचारात पडलं कि नक्की काय करतील ह्या निधीचं?स्त्री सबलता आणि स्व-जागरूकता ह्याच्या साठी ह्या निधीचा उपयोग होईल का? फक्त बलात्कार झाल्यावारच तो अत्याचार आणि रोज घडतं ते काय? साधं बस मधून जाताना सुद्धा अनेक नजरा झेलाव्या लागतात,स्पर्श टाळायचा संघर्ष करावा लागतो, भाजी घेताना देणारा पैसे नक्की बाईच्याच हातात देतो किंवा एखाद्या खूप ओळखीच्या आदराच्या पुरुषाच्या नजरेची एखादीच तिरीप अंगावर शिसारी आणते ह्या सगळ्याला शब्दकोशात काय नाव आहे? आम्ही कोकणात जायचो ती एसटी बस रात्रीची आणि प्रवास चांगला १०-११ तासाचा. आजी संध्याकाळ पासूनच मला आणि ताईला सांगायची पाणी कमी प्या म्हणजे बाहेर बाथरुमला जायला लागायचं नाही. ह्यात तिला आम्हाला रात्री न्यायला लागेल हि चिंता नव्हती तर बाहेर उघड्यावर आपल्या नातींना न्यावं लागेल ह्याची लाजिरवाणी खंत होती. बरं हि गोष्ट झाली २५ वर्षांपूर्वीची, तेव्हड्यात जग इकडचं तिकडे झालं आहे पण स्थिती अजूनही तशीच आहे अगदी ७-८ महिन्यांपूर्वी शिर्डीहून येताना मला खरंच श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ कळाला. पुण्यात घरी येई पर्यंत माझी अवस्था दयनीय झाली होती, तेव्हा आजी आठवली! स्त्रियांना अपेक्षित बदल फार कमी आहेत कारण मुळातच स्त्री आणि पुरुष ह्यांच्यात एक फरक आहे तो सामंजस्याचा त्यामुळे स्त्रियांना आरक्षण देवून त्यांच्यासाठी वेगळी बँक काढून हि सार्वजनिक अनास्था संपणारी नाही. मुळातच सध्या आपल्याकडे बदल होतो तो फक्त उच्चस्तरीय म्हणजे एकदम वरची चादर बदलून कोच चकचकीत पण बसायला गेलं कि आतल्या स्प्रिंगा टोचतात तश्यातला प्रकार आहे. कुठलाही सामाजिक बदल जसा समाजाला सामावून घेतल्याशिवाय होत नाही तसंच स्त्रियांच्या बाबतीत घडणारे हे प्रसंग सुद्धा मुद्धेसूदरित्या तळागाळापासून समजावून दिले पहिजेत. माझ्याकडे काम करणाऱ्या मावशींची नात सुमा एकदिवस शाळेतून लवकर घरी आली आणि ती थेट आमच्याकडेच कारण मावशी त्यावेळेला इथेच असत. सुमाकडे बघतच लक्षात आलं कि सुमा "मोठी" झाली आहे. तिच्या नजरेतलं कुतूहल, भीती अगदी स्पष्ट दिसत होतं पण मावशींनी तिला जे काही फैलावर ह्यायला सुरुवात केली कि मला सुन्न व्हायला झालं. निसर्गाची ही किमया प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा भाग असते आणि हे जीवचक्र त्यावर तर अवलंबून असतं हे एका स्त्रीला कळू नये आणि त्याचा किती तो गहजब? फार पूर्वी हेच चार दिवस त्या बाईसाठी हक्काच्या विश्रांतीसाठी असायचे पण आता काळ बदलला आहे तरीही अनेकांच्या कडे अजूनही त्या चार दिवसांत घरातल्या मुलींना, बायकांना कशी वागणूक असते? हे बदलायला नको का? आज २०१३ साली आपण हीच चर्चा करतो आहोत जी चर्चा १२५ वर्षांपूर्वी सुधारक समाजवादी करत होते. ह्यावरून सिद्ध होतं कि सुधारणा अजूनही बाकी आहे. आपलं काम हे आहे कि हि बाकी लवकरात लवकर भरून काढायची आणि खरंखुरं मजबूत पाऊल पुढे टाकायचं मग त्यासाठी हा "निर्भया निधी" वापरायचा कि आपली ताकद हे ज्या त्या स्त्रीने ठरवावं.पण प्रत्येक स्त्री जर साक्षर झाली आणि तिने "स्वतःला" स्वीकारलं तर कोचच्या स्प्रिंग टोचणार नाहीत उलटपक्षी समाजाचं बस्तान मजबूत होईल. जो पर्यंत आपण किती महत्वाचे आहोत हे समोरच्याला कळत नाही तोपर्यंत बदल होणार नाही. पुरुष मोठा आणि बाई लहान असं कुठल्याही ग्रंथाने सांगितलं नहिये. मला नक्की माहिती आहे जो आवाज चढवतो तो शिरजोर होतो त्यामुळे आपल्याला जर का बदल हवे असतील तर त्यासाठीचं मंथन आपल्यालाच केलं पहिजे. एकतरी नेता असा आहे का कि ज्याने स्त्रियांच्या सार्वजनिक स्वछतागृहांचा प्रश्न तडीस नेला आहे? मुळातच ह्याला प्रश्न म्हणावं लागतंय ह्यातच ह्या अनास्थेचं उत्तर आहे. मी परत परत ह्याच मुद्द्याकडे येते आहे कारण मला स्त्रियांना प्रवासात उघड्यावर अथवा गैरसोयीच्या ठिकाणी जावं लागणं हे एखाद्या शारीरिक अत्याचाराच्याच बरोबरीचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं बदलेल हे चित्र?





Wednesday, February 27, 2013

म म मराठीचा-

  म म मराठीचा-
माझ्या हळव्या मनाला लागे प्रकाश चाहूल,
माझी मायबोली घाले मला हळुवार हाळ;
कण प्रकाशाचे देती क्षण आनंदाचे हाती,
क्षेम स्मरता दुज्यांचे नवी सुखे जन्म घेती;
सुखातून प्रसवे सुख आनंदी आनंद,
नाही तिमिराला जाग मन प्रसन्न प्रसन्न;
दूर देशी जरी आलो ओढ संपली ना कधी,
अशी सारस्वताची हि माय मा‌उली मराठी!
 
            मराठी, एक समृद्ध आणि संपन्न भाषा! मग ती अस्सल पुणेरी असो, वर्‍हाडी वा नागपुरी असो किंवा अनुनासिक कोकणी असो, अहो मराठी ती मराठीच! ठेच लागल्यावर ओह माय मदर ये‌ईल का आपल्या तोंडात? नाही ना, मग म्हणा की राव आम्ही मराठी बोलतो आणि वागतो सुद्धा! काय आहे की माझ्यासारखे नवखे इकडे, म्हणजे अमेरिकेत आल्यावर जरा संभ्रमात असतात की बरीच वर्षे इकडे असलेल्या मराठी मंडळींनाभेटल्यावर मराठी बोलायचं की इंग्रजी? पण हा भ्रम लगेच दूर होतो ते स्थानिक मराठी मंडळाच्या एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर! रोजच्या जगण्यात कितीही अमेरिकन मुखवटा चढवला तरी आपलं अंतरंग मराठीतच संवाद साधत असतं. याचा अर्थ आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा तो ...... असं अजिबात नाही. जिथे जे जसं हवं ते तसंच हवं! म्हणजे पुलंचे विनोद कितीही उत्कृष्ट इंग्लिशमध्ये सांगितले तरी त्याची खुमारी ये‌ईल का? उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद सुद्धा त्याच मूळभाषेतून घेतला तर त्याची गोडी अवीट असते. माझा प्रयत्न कुठलीही भाषिक कुस्ती लढण्याचा नसून आपापल्या भाषेचा यथोचित सन्मान प्रत्येकानं राखावा एवढाच आहे.
            काय गंमत आहे नाही! हे लिहीत‌ असताना माझा मुलगा मला म्हणतो आहे, "आ‌ई, कानाखाली दे‌ईन बरोबर की कानाखाली वाजवेन बरोबर? माझा मित्र सांगतो‌ आहे की त्याची आ‌ई नेहमी म्हणते कानाखाली आवाज काढेन!!" हे ऐकल्यावर मला इतकं बरं वाटलं की नुसती टा‌इम आ‌उट ची मिळमिळीत शिक्षा देता जरा भाषेचा खरमरीत डोस देणार्‍या माझ्यासारख्या पण इतर कोणी आया आहेत. खरंच अतिशयोक्ती नाही, खूप राग आला किंवा खूप वा‌ईट वाटलं तर मला नाही बुवा इतर कुठली भाषा कामी येत. माझी खात्री आहे की हे वाचताना तुम्ही सुद्धा ओठाचा एक कोपरा दुमडून हसता आहात. अहो मग हसाकी मोठ्याने! मनातला आनंद आणि पोटातला रसानंद ह्याची उत्तम मुखशुद्धी म्हणजे हसणं! साहित्य, संगीत ह्याला खरं तर भाषेची मर्यादा नसते, पण आपल्या मातृभाषेत हे कलाविष्कार अधिक जवळचे वाटतात.
            मला एका गृहस्थांनी त्यांची गोष्ट सांगितली होती की ते बोटीतून परदेशी येत असताना त्यांना एक गुजराथी माणूस भेटला. एक भारतीय म्हणून ह्यांना आनंद झाला की चला कोणीतरी बोलायला मिळालं! तो गुजराथी माणूस म्हणाला कि त्याला फक्त गुजराथी आणि हिंदी बोलता येते पण मराठी थोडी समजते. ह्या गृहस्थांनी त्याला सांगितलं की मी मराठीतून बोलतो तू हिंदीत उत्तर दे. भाषा एक रंग अनेक! प्रत्येकाला रंगून जायला एक वेगळा रंग आपल्या मराठीकडे आहे. पुलं, अत्रे, चिं. विं. जोशी भेटले कि पोट धरून हसायचं, पण जी. .भेटले कि गंभीर व्हायचं. आठवतं आपल्याला शांताबा‌ई आणि इंदिराबा‌ईंच्या काव्याचं सोज्वळ अंग! फडके आणि खांडेकर यांच्या कादंबर्‍या आपल्या अनेक रात्रींच्या साथी! माडगुळकर आणि बाबूजी यांनी आपल्याला दिला गीतरामायणाचा प्रसाद! मराठीला मोठं केलं ते साहित्यिक, कवी ह्यांच्या बरोबर अनेक विचारवंत आणि विद्वानांनी! सी. डी. देशमुख, डॉ. नारळीकर, डॉ. माशेलकर, उद्योगपती किर्लोस्कर अशी कितीतरी मोठी नावं चटकन समोर येतात.
बोलता बोलता कुठे ये‌ऊन ठेपलो! असंच होतं! तुमच्यासारखी गप्पा मारणारी मंडळी भेटली की असंच होतं!
मराठी संपली, तिचं भविष्य काय असे अनेक प्रश्न ज्यांना पडतात त्यांना माझं उत्तर असं कि जोपर्यंत आपण,"आई गं" म्हणू तोपर्यंत चिंता करायचं कारण नाही!
 
p.s. आज "मराठी भाषा दिवस" त्या निमित्ताने २ वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख थोडा बदलून तुमच्यासाठी.