Friday, October 19, 2012

"सती"




कोण म्हणतं सतीची प्रथा केव्हाच बंद झाली? सरणावर जळली नाही म्हणून का ती वाचली?
जिवंतपणी सुद्धा तिला चितेची धग जाणवते आहे ,रोजच्या आयुष्यात सुद्धा क्षणोक्षणी ती जळते आहे,
अग्निदिव्याचं प्राक्तन फक्त सितेच्याच कपाळी नाही,हजारो वर्षानंतरही स्त्री ह्यातून सुटलेली नाही,
सती म्हणा जोहार म्हणा ह्याला म्हणा त्यागही,निखार्यावरून चालणं काही तिला सुटलं नाही!
*******************************************************************************
गेले काही दिवस त्या लहानगीने माझं मन व्यापून टाकलं आहे. अवघ्या १४ वर्षांच्या  'मालाला' ने जो काही स्त्री शिक्षणाचा वसा उचलला आहे आणि त्यामुळे तिला ज्या यातनांतून जायला लागतं आहे ते बघून मन हेलावून  गेलं आहे. स्त्री शिक्षण काय,स्त्री भृणहत्या, स्त्रियांवरचे अत्याचार  काय हे एकाच दिशेचे वारे आहेत आणि ज्या कोणी त्या वाऱ्याची दिशा बदलू पाहतात त्यांना वनवास हा ठरलेलाच असतो का? आणखी किती दिवस हे चालू राहणार? समाजाच्या प्रत्येक स्तरात या न त्या प्रकाराने स्त्रीत्वाचा अपमान अवहेलना सुरूच आहे आणि शहाणे म्हणवणारे आपल्याला ते कळतच नाही असे भासवतो आणि मग "सती जाणे " म्हणतात ते हेच का असा प्रश्न मला पडतो! काही महिन्यांपूर्वी बरीच पुस्तक अशी वाचनात आली कि जणू काही एक वैचारिक मालिकाच! "थाउजंड स्पेल्नडीड सन्स","काबुल ब्युटी पार्लर","थ्री कप्स ऑफ टी","स्टोन्स टू द वॉल","अ कप ऑफ अनलाइकली स्टोरीज" आणि "एन्ड ऑफ manners" हि ती पुस्तकं. लेखक वेगळे, प्रत्येक कथानकाची बांधणी वेगळी पण आशय मात्र एकंच, "स्त्री आणि  तिच्या अस्तित्वाचा शोध!". जगाच्या एका टोकात स्त्रिया यशाच्या प्रत्येक शिखरावर आपला ठसा उमटवत असताना नकोश्या झालेल्या स्त्रियांच्या पदरी फक्त वैराणवाटच आहे. राजनीती काय म्हणते अथवा कोण चुकलं म्हणून हि परिस्थिती ओढवली हे मुद्दे सगळे सद्य परिस्थितीपुढे गौण आहेत. 'शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड' अशी काहीशी स्थिती स्त्रियांची ओढवली आहे. 
सं पाहिलं तर अत्याचारांना बळी पडणं हे बहुधा स्त्री असण्याचाच एक भाग आहे. आज सगळीकडे स्त्री भ्रूण हत्यांविषयी आवाज उठतो आहे, स्त्री आणि पुरुष ह्या  समाजातल्या प्रमाणाने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे,उघड उघड मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर नको तो प्रसंग ओढवला जातो आहे आणि हे सगळं आपण ह्याच डोळ्यांनी पाहतो आहोत. मग अशी काही पुस्तकं वाचनात आली अथवा वर्तमान पत्र उघडल्यावर पहिल्या पानावर एखाद्या स्त्रीची यशोगाथा आणि त्याच खाली आणखी एका अत्याचाराची व्यथा वाचली कि काय खरं आणि काय खोटं हे कळेनासं होतं. खरं सांगू आपण सगळे मयसभेत उभे आहोत. आपल्या भोवती सगळं झगमगीत जग आहे त्यामुळे उंबरठ्या पलीकडे जे आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही.असं म्हटलं कि कोणी म्हणतात कि आपण काय करणार? पण आपणच करू शकतो ती गोष्ट आहे ते म्हणजे "स्त्रीत्वाचा आदर". तुम्ही ती नाकोशीची गोष्ट वाचलीच असेल, एखाद्या कुटुंबात जर बर्याच मुलींच्या नंतर परत मुलगीच झाली तर तिचं नाव नकोशी ठेवायची प्रथा भारतात खेड्यात प्रचलित आहे. हे लिहिताना सुद्धा अंगावर काटा येतोय माझ्या.सरकार दरबारी त्या नाकोशींची नावं बदलून दुखावलेली मनं तर बदलता येणार नाहीत. 
पल्या प्रगत समाजात अश्या घटना घडत नाहीत अशी आपली एक समजूत असते पण वस्तुस्थिती अशी आहे कि आपल्याला हि पडद्याआडची गोष्ट लक्षातच येत नाही. लग्नानंतर स्वप्नं घेऊन मुली इकडे येतात आणि प्रत्यक्षात मुलगा दुसर्याच मुलीच्या प्रेमात असतो.कुणी बायकोचा पासपोर्ट जप्त करतो तर कुणी ऑफिसला जाताना तिला खोलीत बंद करून जातो.शेजाऱ्यांशी संपर्क ठेवायला मनाई करणारे तर माझ्याही ओळखीत आहेत.क्वचित एखादी बाहेर पडलीच तर तिला ज्या यातना भोगाव्या लागतात त्या ओठावर न येवू द्यायची काळजी घ्यायला तो विसरत नाही. ह्या अश्या विचित्र वाटणाऱ्या घटनांबद्दल आपण आडून आडून बोलतो पण गरज आहे ती त्या "तिला" मदत करण्याची,नाहीतर जगात अश्या नकोश्या परत परत "सती" जातच राहणार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Tuesday, October 16, 2012

गप्पा

कशी कुठे जुळली असते प्रत्येकाची नाळ, जसे असते नावापुढे ओळखीचे गाव;
विसरून जाते अस्तित्वाची खरीखुरी गोष्ट, पावलांनाही होते अनोळखी वाट;
हातावरच्या रेषा सुद्धा पुसट होत जातात, नवीन नाती शोधत नवी वळणे घेतात;
कधीतरी मग एक असे वळण येते, मन एक सांगत असते तरी पा‌ऊल तिथेच थांबते;
काय आहे तिथे असं थबकण्याजोगं, धूसर दिसून सुद्धा वाटतं काहीतरी नवं!

      मला गप्पा मारायला खूप आवडतं आणि माझी खात्री आहे तुम्हाला सुद्धा माझ्याशी गप्पा मारायला आवडेल. ह्या शिळोप्याच्या गप्पांमधून जसं मला स्वतःला शोधता आलं तसंच बघा तुम्हाला सुद्धा शोधता येतं का ते! काय आहे की इतक्या वर्षांत जे मनात होतं ते कागदावर उतरवता आलं, म्हणजे जे वाटलं ते बोलले, मनापासून गोष्टी शे‌अर केल्या, अगदी जे आठवलं ते सांगितलं. वर म्हटल्याप्रमाणे आपण आयुष्यात पुढे जाताना मागचं सगळं सपाट करत जातो पण तरीही अशा गप्पांमधून, शे‌अरिंग मधून परत एकदा पुसून गेलेलं मनात उमटतं, आणि मनावरची धूळ पुसून काढावीशी वाटते. आपण सगळेच आपला देश सोडून स्वेच्छेने सातासमुद्रापार आलो, इथली जीवनशैली स्वीकारली, भाषा जवळची केली तरीही आत खोलवर जी मुळं आहेत ती परत परत रुजतात आणि अशा गप्पांमधून वाढीला लागतात. मला आठवतं माझे एक आजोबा त्यांच्या आयुष्याच्या चाळिशीत ठाण्यात स्थायिक झाले, ते अगदी ९० वर्षांचे हो‌ईपर्यंत, पण ओळख सांगताना ते "हल्ली ठाण्यात असतो पण मूळचे आम्ही कर्ल्याचे, रत्नागिरीचे", अशी ओळख सांगायचे. आपण सुद्धा नाही का, आडनावाबरोबर त्याला एक मूळगाव चिकटवतो? वास्तविक निम्मी माणसं त्या गावाच्या वाटेला गेलेली देखील नसतात, परंतु न बघता सुद्धा त्यांना अप्रत्यक्षरीत्या ह्या अशा शिळोप्याच्या गोष्टी त्या वाटेवर ने‌ऊन आणतात. काय झालंय, ह्या नव्या जमान्यात तांत्रिक दृष्ट्या आपण इतके जवळ आलोत की प्रत्यक्ष बोलण्यातील मज्जाच हरवून बसलो आहोत. माझे आजोबा, अण्णा रोज आम्हाला त्यांच्या लहानपणच्या गोष्टी सांगायचे आणि इतक्या रंगवून सांगायचे की ज्याचं नाव ते! अशाच गोष्टींत एक गोष्ट असायची ती वेगवेगळ्या पदार्थांची. केळीच्या पानात भाजलेले कंद, पाणचुलीत भाजल्या जाणाऱ्या आंब्याच्या को‌ई, मोहरीचा सणसणीत खार असणारे उकड‌आंबे आणि अशाच कितीतरी. हे सगळं आठवताना वाटतं, की आपल्या पिढीपर्यंत ह्या गप्पा, आठवणी समजण्यासारख्या असतील पण पुढे काय? आपण जेव्हा अशा वयात ये‌ऊ तेव्हा हे संदर्भ आपल्या पुढच्या पिढीला किती असंबद्ध वाटतील नाही का? अहो पण हे चुकीचं आहे, फक्त हजारो मैल दूर आलो म्हणून काय झालं, शेवटी जिथे आपल्या पिढ्यान पिढ्या वाढल्या, घडल्या त्या जगाची ओळख नवीन रक्ताला नको का? कितीही पाठ फिरवली तरी सत्य काही बदलता येत नाही, अगदी कायद्यानुसार बाहेरचे नागरिक झालेले तुम्ही जिथून आलात त्याची बांधिलकी सोडू म्हटली तरी सोडत नाही. नाटक, सिनेमे, गाणी, अगदी स्वतःला अद्ययावत ठेवता पण मुलांना किती पोचवता? नाही नाही माझं असं अजिबात म्हणणं नाही की मराठीत Ph.D. करा पण निदान पाठ तरी फिरवू नका. त्यांना तुमच्या साठी तरी आपली भाषा शिकवा. तुम्ही आम्ही जी गम्मत आपल्या आजोळी, गावी, शहरात केली त्याचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवा. बरेच वेळा पाहण्यात आलं आहे, की १२-१३ वर्षांची हो‌ईपर्यंत बरं मराठी बोलतात पण नंतर मात्र खडखडाट! मग उगीच आपण म्हणणार त्याला कळतं सगळं पण नीट बोलता येत नाही, म्हटलं ही मुलांच्या विरुद्ध तक्रार नाही तुमच्या बद्दल आहे. सवय लावलीत तर गोडी निर्माण हो‌ईल, समभाषिक वातावरणात त्यांना सहज व्यक्त होता ये‌ईल, नाहीतर आहेच मग ना इकडचे ना तिकडचे! माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीचा मुलगा भारतात आज्जीला भेटायला गेला, आजीला वाटलं नातू येतोय इतक्या वर्षांनी तर कुठे ठेवू नि कुठे नको, पण ह्याला हो-नाही शिवाय मराठी बोलायची सवय नाही, कळत होतं सगळं पण बिचारी आजी त्याच्या हो नाही वरच समाधान मानती झाली. आणखी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांना आपल्या संस्कृती बद्दल कुतूहल आहे, आज जगभर भारतीय बुद्धिवंतांचा गवगवा आहे, योगाच्या माध्यमातून, पर्यटनातून भारत अधिकाधिक मुलांच्या मनात प्रगल्भ होतो आहे, तर त्यांची ही जिज्ञासा थोपवू नका, त्यांना आपल्या देशाची ओळख नव्याने करून द्या. पुढल्या भारताच्या दौऱ्यात जरा कोकणात जा, लाल मातीत पाय रंगवा, तिकडे विदर्भ मराठवाड्यात sunscreen शिवाय जा, बघा तुमच्या आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी ये‌ईल. अरे आपण तर गप्पात हरवूनच गेलो! बघा अश्या गप्पा रंगायला काही ओळखच हवी असं नाही आणि बोलता बोलता हळू हळू होईलच कि परिचय. बरं आत्ता येते पण परत माझ्या कट्ट्यावर यायला विसरू नका अजून बरंच काही बोलायचं आहे!