Saturday, October 27, 2012

“व्हॉट आर यु गा‌इज अप टू इन शिकागो?”

      असा सवाल व्हीसा ऑफिसरने मला केला आणि काय उत्तर दे‌ऊ असा प्रश्न पडला, कारण माझं शिकागोचं ज्ञान भूगोलाच्या पुस्तकातला कत्तलखाना, आणि सी‌अर्स टॉवर ह्याच्या पलीकडे नव्हतं. माझा गोंधळलेला चेहेरा पाहून त्याने हसून एक सल्ला दिला, मुली, निव्वळ दिलखुलासपणे शिकागो फिर, शिकागो कधीच कुणाला निराश करत नाही. हे वाक्य माझ्या मनात इतकं खोलवर कोरलं गेलं कि, ओहेर विमानतळावर पोचल्याक्षणीच माझ्या मनाने पसंतीचा कौल दिला. तिथून सुरु झालेला हा शिकागोनुभव आपणा सर्वांनाही मिळावा, ह्यासाठी हा लेखप्रपंच.
      पण तत्पूर्वी जाणून घे‌ऊ जरा ह्या शहराच्या पूर्व इतिहासाबद्दल. नावात काय आहे म्हणताना नावातच गावाचं गुपित असतं हेच सत्य आहे, म्हणूनच शिकागोनदीच्या काठी पिकणाऱ्या कांद्याच्या मूळ फ्रेंच shikaakwa (Stinky Onion) नावावरून शिकागो हे नाव जन्माला आले. सागरासमान भासणाऱ्या मिशिगन लेक च्या काठावर वसलेले हे गाव सुमारे १७७० सालच्या आसपास वसाहतींना आकृष्ट करू लागले. ४ ऑगस्ट १८३० रोजी शिकागो महानगर पालिकेची स्थापना झाली. ह्याच दरम्यान यांकी वसाहतगारांनी शिकागोची भौगोलिकता जाणून घे‌ऊन आजूबाजूच्या भागांना जोडता येणारे रस्ते बांधून व्यापार-उदीमाचे नवे क्षेत्र म्हणून शिकागो नावारूपाला आणले. इलिनॉय-मिशिगन कनालगलेना-इलिनॉय रेल्वे ह्यांची स्थापना १८४८ साली हो‌ऊन शिकागोची औद्योगिक घोडदौड इतकी वाढली कि १८७० पर्यंत शिकागो शहराची गणना जगातील इतर मोठ्या शहरांत हो‌ऊ लागली, पण १८७१ साली अशी एक हृदयद्रावक घटना घडली कि ज्यामुळे शिकागो च्या पत्रिकेतील सगळे ग्रह उलटे सुलटे झाले. ती घटना म्हणजे दि ग्रेट फायर ऑफ शिकागो. संपूर्ण भस्मसात झालेल्या ह्या शहराने जन्म दिला एका नव्या दिमाखदार शिकागोला, आणि गगनाला हात टेकणाऱ्या स्कायस्क्रेपर इमारतींना. अमेरिकेच्या वास्तुशिल्पविद्येत आमूलाग्र बदल करून, न्यूयॉर्क शहराशी टक्कर देत शिकागो शहर पुन्हा एकदा उन्नतीच्या प्रवासाकडे वाटचाल करू लागले. ३ मिलियन एवढी लोकसंख्या असलेल्या ह्या शहराला नेहमीच सेकण्ड सिटी असं संबोधलं गेलं आहे, पण तरीही माझ्यासारख्या प्रत्येक शिकागोप्रेमी माणसाच्या हृदयात शिकागोचं स्थान अढळ आहे. एका नजरेत मनाला भिडणारा शिकागोचा आवेग मला तर प्रेमानुभूती दे‌ऊन जातो. प्रत्येक वेळी नवीन भासणारा मिशिगन लेकचा किनारा, वेगवेगळ्या ठिकाणांहून अनुभवायला हवाच. वाऱ्याच्या वेगाने downtown च्या ओघवत्या प्रवाहात स्वतःला झोकून दे‌ऊन तर बघा!
      कला आणि कल्पकता ह्यांचा मिलाफ आपल्याला जागोजागी दिसून येतो. Art institute, Museum of contemporary art आणि नवीनच साकारलेले The Bean हे शिल्प म्हणजे ह्याची उत्तम उदाहरणे आहेत. वास्तुशिल्पातला चमत्कार म्हणजेच Willis Tower (पूर्वीचा Sears) त्याच थाटात शिकागोला सलाम ठोकत उभा आहे. मी तर Willis Tower आणि John Hancock इमारतींना शिकागोचे भालदार चोपदार म्हणते. उत्कृष्ट वास्तुशिल्पकला अनुभवायची असेल तर शिकागो रिव्हर मधून बोटीची सफर घेता येते. ह्या तासाभराच्या सफरीत इतिहासाची कितीतरी पाने उलटून पाहता येतात. इतिहासावरून आठवलं कि, ज्यांचा इतिहास मोठा कठीण आणि काळा असतो त्यांना तो पुसून स्वतःचं भविष्य नव्यानं लिहिताना वेदना होतातच. अगदी तसंच काहीसं शिकागोबाबत झालं. माफिया, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार ह्यांनी पोखरलेल्या अवस्थेतूनजगातील काही मोठ्या आणि यशस्वी शहरांच्यात नाव घेता येण्याजोग्या उत्तम स्थितीपर्यंतचा खडतर प्रवास शिकागोने केला आहे. त्यात अनेकविध लेखक, कलाकार, तंत्रविशारद, संगीतकार, राजकारणी लोकांचा समावेश आहे. शहराची बांधणी ही नुसती एककल्ली न होता अतिशय खुल्या अशा मनोवृत्तीचं दर्शन इथे होतं. मला सगळ्यात प्रिय असणारी जागा म्हणजे Grant Park. तिथलं Millennium Park, Buckingham Fountain प्रत्येक वेळा नवीन अनुभव दे‌ऊन जातात. अध्यक्ष बराक ओबामा ह्यांचा अमेरिकेच्या राजकारणाचा नवा अध्याय Grant Park च्या प्रांगणातच सुरू झाला. शिकागोबद्दल बोलताना Cubs, White Sox, Blackhawks, Bulls, Bears ह्यांना विसरून कसं चालेल? शिकागोची शान म्हणजे नेव्ही पि‌अर. तिथे वाऱ्याशी गप्पा मारत १५ मजली उंच फेरीस व्हील मध्ये बसल्यावर जेव्हा सगळं शिकागो शहर आपल्या समोर दिसतं नं, तेव्हा ह्याच साठी केला होता अट्टाहास ह्या ओळी खऱ्या वाटू लागतात!
      (लेखासाठीचे संदर्भ: विकिपीडिया आणि नॅशनल जि‌ओग्राफिक ट्रॅव्हलरचा सप्टेंबरचा2010 अंक)




"कढी"

दोन वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाचं पंधरावं अधिवेशन शिकागोला करायचं ठरलं तेव्हा मी शिकागो रहिवासी होते आणि मुळातच उत्साही असल्यामुळे अधिवेशनाच्या तयारीत माझाही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न म्हणून मी लेखणी सरसावायची ठरवली. विविध विषयांच्या माध्यमातून मी अधिवेशानाचे आवाहन BMM Vruttaतून करीत असे. वास्तविक प्रासंगिक वाटणारे लेख माझ्या कल्पनेपेक्षाही लोकप्रिय ठरले. "बकुळफुले" वर ते लेख तसेच सदर करणे म्हणजे कदाचित शिळ्या कढीला उत आणण्यासारखे वाटेलही पण परत चुरचुरीत फोडणी दिलेली कढी जास्त आस्वादक लागते हेही खरंच आहे. मी काही निवडक लेख थोडे बदलून तुमच्या वाचनासाठी इथे पोस्ट करत आहे, बघा ह्या कढीची चव तुम्हाला कशी वाटते ते!