Friday, March 15, 2013

"कुतूहल"
       परवा "बालक-पालक" हा बहुचर्चित मराठी चित्रपट पहिला आणि "बी-पी" ह्या तथाकथित झाकल्या मुठीची नवीन उकल करणारा एक चित्रपट बघितला असं वाटे पर्यंत एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने लक्षात आली की जगात फक्त दोनच जाती आहेत एक "नर" आणि दुसरी "मादी"! जे काही कुतूहल आहे ते ह्याच दोन घटकांभोवती फिरतं आहे. ह्या कुतूहलातून जर मोठी माणसं सुटली नाहीत तर ही अर्धवट वयातली कच्चं ज्ञान असलेली मुलं तरी कशी सुटतील? मला आत्ता वयाची चाळीशी आली तरी ह्या विषयावर लिहिताना पन्नास वेळा विचार करावा लागला कारण उभ्या आयुष्यात ह्या विषयावर बोलण्याची हिम्मत झाली नाही. ते कशाला? रेल्वे स्टेशन वर ती टांगलेली पुस्तकं असतात नं त्यांच्याकडे तर एका डोळ्याने बघायची सुद्धा लाज वाटायची. मी एक वाचनालय लावलं होतं तिथे उंचावर काही मासिकं असत. मला भयंकर कुतूहल होतं कि काय असेल त्यात? आणि एक दिवस दुसरं पुस्तक शोधताना वरून एक मासिक अचानक खाली पडलं. आता पडलंच आहे तर बघू म्हणून मी उघडणार इतक्यात तिथल्या क्लार्क बाईंनी ते मासिक हिसकावून घेतलं आणि माझं कुतूहल तसंच राहिलं. माझी नक्की खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला त्याच्या आड वयात अशी एकदा तरी संधी येते हे कुतूहल जाणण्याची पण अशी संधी बहुतांशी हुकतेच. ज्यांना समंजस पालक असतात त्या सगळ्यांचं वयात येणं सुसह्य होतं पण ज्यांची भावनिक घुसमट होते त्यांचं कुतूहल काहीवेळेला वेड्या वळणावर सुद्धा जातं.
       माझ्या मुलाच्या शाळेत गेल्यावर्षी "Health Education" च्या खाली ह्या "कुतूहलाशी" त्यांची पहिली ओळख करून देण्यात आली पण त्या आधी घरी एक पत्रक आलं ज्यात मुलांना नक्की काय सांगणार आहेत ह्याची माहिती होती आणि पालकांची त्यासाठी संमती हवी होती. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा घरी आला आणि त्याने सांगितलं की त्याला "Health Education" मध्ये जायचं नाहीये कारण त्याचे दोन मित्र जाणार नहियेत. मला जरा नवल वाटलं म्हणून मी एका मुलाच्या आईला ह्याबद्दल बोलायला फोन केला तर तिने मला सांगितलं की; "हे जरा लवकरच होतंय सगळं, मुलं किती लहान आहेत अजून आणि हे असलं घाणेरडं ऐकून त्यांच्या मनावर किती परिणाम होईल?". मी स्तब्ध झाले कारण काळ बदलला आहे ह्याकडे पालक किती दुर्लक्ष करताहेत ह्याची परत एकदा जाणीव झाली. म्हणजे आजूबाजूला जे चाललं आहे ते मुलं वजा करून जाताहेत का? त्यांना नसतील प्रश्न पडत? की उठसूट हे बाया बुवे टीव्हीवर,जाहिरातीत,मासिकांच्यात पापे घेतात, मिठया मारतात, बिचवर लोळतात म्हणजे नक्की "हे" आहे काय? आपल्यापैकी प्रत्येकाच्या मुलांनी एकदा तरी "बाळ कसं होतं?" हा प्रश्न विचरून आपल्याला कोड्यात टाकलेलं असतं. मी माझ्या मुलाला सांगितलं होतं कि मी त्याला "दवाखान्यात" बुक केलं होतं (माझं नशीब कि त्याने रिसीट मागितली नाही). हे तेवढ्यापुरतं ठीक आहे पण मुलांच्या आणि मुलींच्या आयुष्यात पहिले स्त्री पुरुष त्यांचे आई-वडील असतात आणि अशी वेडी वाकडी माहिती मिळून काहीवेळेला मुलांच्या मनात आई वडिलांच्या बदल दुराग्रह/राग निर्माण होऊ शकतो.
          बरं हे जे "कुतूहल" आहे नं हे फक्त "मिलनाची माहिती" ह्यापेक्षा खूप जास्त आहे. ह्यात जबाबदारीची जाणीव आहे, स्त्री बद्दलचा आदर आहे आहे त्यावेळेलाच प्रेमाचाही जबाबदार स्वीकार आहे. ज्याचं "कुतूहल" ह्या मार्गांनी शमतं तोच भावी आयुष्यात एक चांगला नागरिक बनू शकतो. माझ्या आठवणीत लहानपणी "केअर-फ्री" ची जाहिरात आली की "हे धरणी मला पोटात घे" असं व्हायचं कारण "महिन्याचं ते गुपित" फक्त बायकांपुरतंच असावं असा दंडकच होता जणू. काही नियम आणि चौकटी अबोल असतात पण त्या जर वेळीच बोलक्या झाल्या तर समाजालाच त्याचा फायदा आहे हे कळायची वेळ खरं तर उलटून गेली आहे. हल्ली बहुतेक शाळांमध्ये " "Health Education" आहे, पण तुम्ही जर ह्याच कुतूहलातून तुमच्या तरुणपणी गेला असाल तर तुमच्या बालकाचे पालक तुम्ही व्हा आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणा,"बोल मित्रा"!

Tuesday, March 12, 2013

केसांचे काय करायचे?


केसांचे काय करायचे?

छे बुवा हे लफडंच आहे केसांचं! मला माझे केस सोडून (आणि बांधून सुद्धा...हा हा हा) सर्वांचे केस सुंदर दिसतात. सरळ केस, कुरळे केस, लाटा लाटांसारखे झुलणारे केस, बेधुंद मुक्त केस, कपाळावर रुळणारे केस,लांबसडक केस,काळेभोर मऊसुत केस,किंचित कुरळे पण किंचित सरळ केस,कानाबरोबर कापलेले छोटे केस,मानेवर रुळणारे आत्मविश्वासी केस,कसेही वळवले तरी सुंदर वळणारे केस, मधोमध भंग पाडलेले केस,चपचपून तेल लावलेले केस,तुर्रेबाज केस,मेंदीने रंगवलेले केस,रंग उडालेले केस,पांढरे केस,खरबरीत केस,विस्कटलेले केस,छान कापलेले केस!!! बापरे किती प्रकार ह्या केसांचे पण एकही प्रकार माझा असा नाही म्हणजे बघा जर कुठे केस वाळवावेत तर नेमका पाण्याचा हात लागतो, ब्लो ड्राय करून बाहेर पडणार इतक्यात पावसाची सर यावी आणि केस चपटे, मस्त पिना बिना लाऊन तयार व्हावं आणि स्वेटर चढवताना नेमकी पिन अडकावी. केस सरळ करावेत तर ट्रेंड कुरळ्या केसांचा येतो, मग परत कुरळे करायचे तर सरळ केस झटक्यात ट्रेंडमध्ये परत हजर! आहे कि नाही पंचाईत? बरं काही नको तो झमेला आपले आहेत ते बरे म्हणून कुठे जावं तर तिथे सगळ्याजणी अश्या काही सूड घेतल्या सारख्या केसांचे प्रकार करून आलेल्या असतात कि आयत्यावेळी आता काय करायचं म्हणून डोकं दुखायचं नाटक करत एकसारखं केसात हात फिरवत बसायला लागतं. कठीण आहे, केसाचं नक्की काय करायचं हे केसांच्या गुंत्यापेक्षा महाकिचकट आहे.